स्वाभिमानानं जगा…

स्वाभिमानानं जगा नुकताच बालकामगार विरोधी दिन होऊन गेला. सरकारनं बालकांच्या मानवी अधिकाराच्या जपणुकीसाठी कायदा केला आहे. बालकांना त्यांचं हळव, सुंदर

स्वाभिमानानं जगा

नुकताच बालकामगार विरोधी दिन होऊन गेला. सरकारनं बालकांच्या मानवी अधिकाराच्या जपणुकीसाठी कायदा केला आहे. बालकांना त्यांचं हळव, सुंदर असं बालपण जगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. तो त्यांना मोकळेपणानं मिळायला हवा, यासाठी सरकार जितके प्रयत्नशील आहे, तितकाच प्रयत्न बालकांच्या पालकांनी, समाजाने आणि लोकप्रतिनिधींनीपण केला पाहिजे. कारण प्रत्येक अमंगल, वाईट गोष्टी होऊ नये यासाठी सरकार कायदे करतंच, पण केवळ कायद्यानं कोणताही प्रश्न सुटत नसतो. त्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हायला हवेत.

आता प्रश्न येतो तो सद्यस्थितीत समाजात मोठ्या प्रमाणात असलेले बालकामगार. जगात १०० कोटी बालकामगार तर एकट्या भारतातील संख्या अपडेट करणे गरजेचे आहे. तेव्हा विचार व्हायला हवा कि, बालकामगारांची संख्या हि का वाढते आहे ? एक यातलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे गरिबी. तसंच अज्ञान आणि घरातली वाढलेली लोकसंख्या. हि देखील अन्य कारणे. समजा घरात एकदोनच मुलं असतील, घरातले पालक बऱ्यापैकी काम करून मुलांचा सांभाळ करू शकतील, पण घरातल्या वृद्धांची संख्या, जे काहीही काम करू शकत नाहीत, अपंग व्यक्ती, व्यसनाधीन वडील, आजूबाजूचं गुन्हेगारीला पोषक असणारं वातावरण या सगळ्यामुळे घरातील लहान मुलांना कामावर पाठवण्याची मानसिकता वाढीला लागलेली दिसते आणि मग मिळेल ते काम पदरात पाडून घेऊन मग त्या मुलांना कामाला जुंपल जातं. अशा गरजू मुलांना मग समाजातील हॉटेल मालक वा तत्सम व्यावसायिक चौदा चौदा तास राबवून घेतात आणि मुलांचं बालपण करपलं जातं.

आता हे खरे आहे की, गरिबी भूक हे महत्वाचे प्रश्न आहेत. यासाठी घरातल्या मुलांना कामावर जावंच लागत असेल तर निदान समाजानं तरी त्यांच्या या गरजेचा गैरफायदा न घेता त्या मुलांच्या वयाला समजून घेऊन काम द्यावे. कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्या थोर समाजसेवकाने समाजाची ही मानसिकता पाहून गरीबांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी कमवा आणि शिका हा मंत्र दिलाच होता. तेव्हा फक्त कमवा एवढ्यापुरतेच मर्यादित अर्थ न घेता. शिक्षणालाही तेवढाच अग्रक्रम दिला गेला पाहिजे. कचरा गोळा करणे, हॉटेलमध्ये, मोठं- मोठ्या श्रीमंताच्या घरी कारखान्यामध्ये, शिवणाच्या क्षेत्रात, अशा विविध ठिकाणी बालकामगार आढळून येतात. काम केल्याशिवाय रोटी मिळत नसेल, तर या मुलांना कामावर जाऊ नका असे म्हणणे मला वाटतं एका दृष्टीने बरोबर ठरणार नाही. पण अशा मुलांना स्वाभिमानानं जगायला शिकवून कामाबरोबरच शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणं. त्यासाठी त्यांना मदत करणं हे प्रत्येकांनी आपले कर्तव्य मानले पाहिजे. जर मुलं भुकेली राहतील तर मग वाममार्गाला लागणर नाहीत का ? भिक मागायला प्रवृत्त होणार नाहीत का ? गुन्हे करायला उद्युक्त होणार नाहीत का ? चांगल्या श्रमाला प्रतिष्ठा असते. फक्त प्रश्न असा निर्माण होतो की, त्या कोवळ्या जीवांच्या शरीर मनाला पेलेल, भावेल असं काम देता आलं पाहिजे. लाचार होऊ न देता, कुणाच्याही हातापाया पडू न देता. या मुलांना जगायला शिकवलं पाहिजे. नाहीतर कायदा असल्याने मुलांना कामावरच ठेऊन घ्यायचं नाही आणि त्यांच्या मुलभूत गरजाही पूर्ण होणार नसतील, तर “आई जेऊ देईना, बाप भिक मागू देईना” अशी अवस्था व्हायची. बरं, काही मुलांना शिक्षणात गती नसते. आवडही नसते मग अशा मुलांना कामावर पाठवण्याची पालकांची मानसिकता होते. अशा मुलांना योग्य त्या कमावर पाठवायला हरकत नाही, पण त्यांची आवड पाहून त्या क्षेत्रात त्याला काम करू दिले आणि पोटापुरतं शिक्षण देता आलं तर हा प्रश्न फार गंभीर होणार नाही. व्यावसायिक शिक्षण जर देण्याची तयारी सामाजिक संस्थांनी घेतली, तर बालकामगारांचं आयुष्य उजळू शकेल.

आता पौरोहित्य लहानपणापासून मुलांना शिकवले जाते. गाणे, नृत्य हेही लहान मुलांना शिकवले जाते, आज चित्रपट, मालिका, नाटकांमधून व्यावसायिक स्तरावर कितीतरी लहान मुलं दिसत आहेत.खेळण्या-बागडण्याच्या वयात या मुलांना पालक अशा प्रसिद्धीच्या आणि पैशाच्या दावणीला बांधतात. हे कितपत योग्य आहे ? झोपडीतले मुलं असो वा महालातले, त्यांच्या भावना निरागस, बालसुलभ असणार, पण या क्षेत्रातल्या मुलांकडे समाजाचा दृष्टीकोन अभिमानाचा, कौतुकाचा असतो. त्यांना राबवून घेणाऱ्यांना आपण बंदी घालत नाही. हे चुकीचे आहे.

एकूणच मुलांना धोकादायक ठिकाणी, त्यांच्या शरीरमनाला इजा होईल अशा ठिकाणी कामाला ठेऊन न घेण्याची सक्ती व्हायला हवी. कष्टातून शिकणारी अनेक मुलं आज  मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. जगातली जी मोठी व्यक्तिमत्व आहेत. ती अशीच काम करून शिकून मोठी झाली आहेत.

समाजानं अशा गरीब होतकरू मुलांकडे लक्ष देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य मदत केली पाहिजे. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांची मुलं-मुली, मोटार चालकांची मुलं यांना शिकण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. त्यांना आर्थिक व तत्सम मदत करून स्वाभिमानानं शिकण्याची, उभे राहण्याची वृत्ती जोपासायला शिकवले पाहिजे. केवळ कायद्यावर अवलंबून न राहता आपण सगळेच असा प्रयत्न करूयात, नाही का ?

COMMENTS