शिक्षा करायला आवडत नाही

शिक्षा करायला आवडत नाही दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. महाराष्ट्रामधील बरेच तालुके दुष्काळाच्या छायेखाली असतात. सोलापूरसह महाराष्ट्रातल्या बऱ्याच

Why our world would end if living room decors disappeared
आज केलेली बचत म्हणजे भविष्यकाळाचा आधार…
थिंक टँक

शिक्षा करायला आवडत नाही

दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. महाराष्ट्रामधील बरेच तालुके दुष्काळाच्या छायेखाली असतात. सोलापूरसह महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवते. गहू ज्वारी, साखर, टूर डाळ, गोडेतेल यांचे भाव गगनाला भिडत असतात. वर्तमानपत्रात वाचलं की सोन्याचा भाव तर गगन छेदून पार गेलं आहे. अर्थात सोनं नाही खरेदी केलं तरी तसं फार बिघडणार नाही. पैसा असणाऱ्यांचा ओढा सोन्याकडे पण सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त होतो. जनावरांना चारा उपलब्ध होणं कठीण जातं. मग शेतात पिकवायचं कसं आणि काय ? याचाही प्रश्न पडतो. जमिनीत जलसाठा कमी कमी होत चाललाय. अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रं व मीडियातून ऐकायला, वाचायला, पाहायला मिळतात. आता हे सगळं असह्य होत आहे. मग यावर आता उपाय काय ? याचा विचार प्रामुख्याने तुम्ही – आम्ही करायचा आहे, असं मला वाटतं.

आपलं होतं काय, आपण प्रत्येक गोष्टीत सरकारवर अवलंबून राहतो. अगदी, घरच्या बाहेर कचरा आपण टाकणार आणि तो प्रशासनाकडून उचलला जावा, असं आपण म्हणणार. आपल्या घरी बोअर घेणार आपण जमिनीतल्या पाण्याचा भरमसाठ उपसा करणार, नळाचे पाणी हवं तेवढं वापरणार आपण आणि भूजलसाठा कमी झाला म्हणून सरकारच्या नवे ओरडणार, पाणी नाही म्हणून प्रशासनाला धारेवर धरणार आपण. उघड्यावरचं अन्न खावू नका, स्वच्छता राखा असं आरोग्य विभागाकडून खुपदा सांगितलं गेलं असतानाही, उघड्यावरचे पदार्थ चवीने खाणार आपण, आपल्या घरातला कचरा कोंडाळ्यात न टाकता बाहेर टाकणार आपण. आपल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्याची सर्व घाण मिसळली जाते आहे, हे कळून पण मुग गिळून घरात आपण गप्प बसणार आणि कोणा संस्थेनं वा व्यक्तीने याविरुद्ध आवाज उठविण्याचं धाडस केलं की, त्याला प्रतिसाद न देता फक्त बसल्या ठिकाणी चर्चा करणारे आपणच. प्लास्टीकचा वापर टाळा असं कानीकपाळी ओरडून सांगणाऱ्या चांगल्या लोकांच्या म्हणण्याला न जुमानता प्लास्टिक वापरणे हा जणू जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे वागणारे आपण, प्रदूषणाचा कडेलोट होतोय भान आपण ठेवत नाही. आता पाऊसमान कमी झालाय तरी वृक्षांची तोड, अनेक तंत्राचा वापर करून वातावरण कलुषित करणारे आपण आणि याविरुद्ध एकजूट करून या विघातक प्रवृत्तीविरुद्ध उभं ठाकलं पाहिजे याची जाणीवही नसणारे वा ठेवणारेही आपणच ना !

पोपटराव पवार यांनी नगर जिल्ह्यातल्या व्यक्तीनं हिवरे बाजार या यांच्या गावाचं सोनं केलंय. आजमितीला येथे म्हणवा तसा पाऊस झालेला नसतानाही गावकरी गावाच्या कल्याणासाठी एक होवून जे काम करताहेत. पाण्याचं, धान्याचं नियोजन करताहेत याबाबतीतही आपल्याला माहित आहेच. वर्तमानपत्रात आपण भरपूर वाचलंय, मग पोपटराव पवारांच्या अभ्यासाचा, चिंतनाचा, कामकाजाचा आपण आपल्या गावासाठी किती उपयोग करून घेतलाय ?

शेतकऱ्याने धान्याचे, भाजीपाल्याचे जरा भाव वाढवले कि लगेच आंदोलनं, मोर्चे सुरु होतात. अहो पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा, त्याच्या कष्टाचा त्यांच्या स्वप्नांचा कोणी विचार करणार आहे कि नाही ? कांदा महागला अगदी ५० रुपये किलो झाला. मग एक करा, नका खाऊ कांदा थोडे दिवस. कांदा नाही खाल्ला तर काय बिघडणार आहे ? बरं, हा कांदा महाग आहे आणि तो अतिशय गरीब, अल्पआर्थिक प्राप्ती असणाऱ्यांना, मध्यमवर्गीयांना कांदा का महाग वाटावा ? त्यातून वाटलाच तर काही दिवसांकरिता कांदा विकत घेऊ नका, पण जर शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चाला न्याय मिळत असेल, तर मिळू देत ना त्याला चार पैसे अधिक.

मला अजून एक सांगावसं वाटतं, आपल्या सरकारने जर दोन रुपये किलोने धान्य विकायचं ठरवलं, तर गरिबातला गरीब माणूसतरी जीव तोडून काम करेल का हो ? ईश्वराने शारीरिक, बौद्धिक, मानसिक शक्ती प्रत्येकाला दिली आहे. त्याचा पुरेपूर वापर करण्याची दृष्टीही दिली आहे, पण जर अल्प रक्कमेत धान्य मिळायला लागलं, पोट भरायला लागलं तर सर्वसामान्य मानसं मोठं होण्यासाठी कोणतीच झेप घेणार नाहीत. ते दिवसेंदिवस आळशी बनतील ना ! अर्थात हे खरं आहे कि आर्थिक प्राप्तीपण सर्वसामान्यांना बऱ्यापैकी व्हायला हवी असेल तर प्रत्येक हाताला काम दिलं पाहिजे. पण आता कामाचीपण कमतरता दिसत नाही. अनेक ठिकाणी नोकरी उपलब्ध असल्याच्या जाहिराती पाहण्यात येतात. तेव्हा मिळेल ते काम सचोटीने, चिकाटीने करण्याची तयारी ठेवली पाहिजे. खरं पाहायला गेलं तर लोकसंख्या ही आपली शक्ती आहे. या शक्तीचा सदुपयोग व्हायला हवा. मिळेल तिथे, मिळेल ते काम करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे.आपल्यात आपल्या बुद्धिमत्तेचा, शक्तीचा उपयोग प्रत्येक भारतीयाने दहा टक्के जरी केला, तरी भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही, असं मला वाटतं.

दुष्काळाचा जरा चिकित्सेनं अभ्यास केला तर एक लक्षात येईल की, दर ३-५ वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा विचारपूर्वक नियोजन केलं तर या दुष्काळाला तोंड देता येईल. आपल्याकडे असलेल्या सूर्यप्रकाशाचा, हवेचा वापर करून वीजनिर्मितीवर होणारा ताण हलका करता येईल. पाण्याचं नियोजन, साठवण पुनर्भरण याद्वारे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी वाचावता येईल. अन्न – धान्याची साठवण सरकारी पातळीवर तर होणं गरजेचं आहेच, पण पूर्वीसारखं जर वर्षाचं धान्य खरेदी केलं तर महागाईपासून थोडासा का होईना बचाव होईल.

मला खरं तर मनापासून वाटतं की, १९७२ इतका भीषण दुष्काळ आजू नाही. आता पडणाऱ्या पावसाचा एक एक थेंब कसा साठवता येईल ते पाहायला हवं. बोअरचे पुनर्भरण करणं आणि टीबक सिंचनाद्वारे शेती करणं, चैनीच्या वस्तू खरेदी करणं थांबवून महागाईला संयमाने तोंड देणं गरजेचं आहे. आपल्याबरोबरच तळागाळातील लोकांचाही विचार करून अतिरीक्त ठिकाणी खर्च होणारा पैसा वाचवून त्यांना काही मदत करता येईल का ? त्याच्यासाठी खारीचा का होईना वाटा उचलता येईल का ? याचा विचार सर्वांनीच करायला हवा आहे.

हा दुष्काळ आपल्याला सावध करतोय तसेच आव्हानही देतोय. सावध करून सांगतोय की, यापुढे पाऊसपाणी, सूर्यप्रकाश, अन्नधान्य यांच्याबाबत नियोजन करा. झाडं लावा, पाणी जिरवा, पाण्याचा काटकसरीने वापर करा, कमी पाण्यावरील शेतीचा अवलंब करा, स्वतःपुरतं न राहता परोपकारी वृत्तीनं इतरांना मदत करा, तर आव्हान देतोय की, माणूसपण जपत या दुष्काळातून तुम्ही कसे बाहेर पडणार आहात, हे ठरवा

तेव्हा हि संधी आहे आपल्याला सुधारण्याची. निसर्ग तुम्हाला सांगतोय की, मी दर पाचेक वर्षांनी वर्षांनी अशी स्थिती आणणार आहे बरं का ? बघा कसं सामोरं जायचं ते. तुम्ही प्रयत्न करा, तुमचे प्रयत्न निसर्गाला अनुकूल असतील तर संभाव्य दुष्काळाचं रुपांतर सुकाळात होईल. पाऊस नाही आला तरच तुम्ही चर्चा करता. पाऊस आला की परत “ये रे माझ्या मागल्या !” निसर्ग म्हणत असेल की, पोरांनो, असं करू नका. दुष्काळ घेऊन यायला मला आवडत नाही, पण तुम्ही जे मस्तवाल झालात, कसंही वागलं तरी चालेल असं म्हणून ज्या चुका करताहात, त्याला मग शिक्षा नको का ? तेव्हा यापुढं तुम्हाला शिक्षा करायला मला लावू नका. मी सगळीकडे सुजलाम सुफलाम असेल तरच भरून पावणार आहे. निसर्गाची ही हाक आपण ऐकणार ना !

COMMENTS