महापालिकेकडे हद्दवाढ विभागाचा विकास आराखडा तरी तयार आहे का? आ. सुभाष देशमुख आक्रमक: आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

महापालिकेकडे हद्दवाढ विभागाचा विकास आराखडा तरी तयार आहे का? आ. सुभाष देशमुख आक्रमक: आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल सोलापूर (प्रतिनिधी)

पदवीधर निवडणुकीत भाजपचा गड राखा : मनीष देशमुख
शिरवळचे सरपंच सोनकांबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना मताधिक्क्य देणार : आ.सुभाष देशमुख

महापालिकेकडे हद्दवाढ विभागाचा विकास आराखडा तरी तयार आहे का?

आ. सुभाष देशमुख आक्रमक: आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

सोलापूर (प्रतिनिधी)
गेल्या तीस वर्षांपासून हद्दवाढ भाग सोयीसुविधांपासून वंचित आहे. पाणी, रस्ते नाहीत, ड्रेनेजची सुविधा नाही पथदिवे नाहीत, सर्वात जास्त कर या भागातील नागरिक भरत असूनही त्यांना न्याय मिळत नाही, त्यांची कुचंबणा होत आहे. तुम्ही हद्दवाढ भागाकडे लक्ष देणार आहात की नाही, महापालिकेकडे हद्दवाढ विभागाचा विकासाचा आराखडा तरी तयार आहे का, असे खडेबोल आ. सुभाष देशमुख यांनी पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना सुनावले.
महानगरपालिका हद्दवाढ भागातील समस्या व अडीअडचणी विषयी आ. देशमुख यांनी आढावा महानगरपालिका सभागृहात घेतली. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, मनपा आयुक्त पी. शिवशंकर,उपमहापौर राजेश काळे, भाजप शहराध्यक्ष विक्रांत देशमुख, सभागृह नेते शिवानंद पाटील,श्रीनिवास करली तसेच सर्व अधिकारी वर्ग आणि नगरसेवक उपस्थित होते. हद्दवाढ भागात म्हणाव्या तशा सोयी सुविधा नसल्यामुळे या बैठकीमध्ये आ.सुभाष देशमुख आक्रमक झाल्याचे दिसून आले.
ते म्हणाले की, हद्दवाढ होऊन तीस वर्ष झाले तरी अद्यापही या भागातील नागरिक रस्ते, पाणी ड्रेनेज आदी सोयी सुविधांपासून वंचित आहेत. हद्दवाढ भागात पाणी सुद्धा पाच ते सहा दिवसांनी कमी दाबाने आणि वेळी अवेळी येत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या भागात साधे पथदिवे सुद्धा नाहीत. दोन वर्षांपूर्वी एलईडीचा प्रस्ताव दिला होता मात्र अद्यापही तो मंजूर झालेला नाही. या भागातील नागरिक सर्वात जास्त कर महापालिकेला भरतात, मात्र त्यांना मूलभूत सोयी सुविधाही मिळत नाहीत. या भागातील विकास कामासाठी अनेकवेळा निधी दिलेला आहे, मात्र कामे झाली नसल्यामुळे तो निधी परत गेलेला आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. हद्दवाढ भागात पुरेशी जागा असूनही लहान मुलांसाठी क्रीडांगण नाही, ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्क नाही. यासाठीही निधी दिलेला आहे.मात्र कामे अद्यापही झालेले नाहीत. जुळे सोलापुरात नाट्यगृहाला जागा मिळावी म्हणून प्रस्ताव दिला आहे मात्र तोही प्रस्ताव रखडलेला आहे. ही कामे लवकर होणे अपेक्षित आहेत. सोलापुरात कंबर तलावासारखे प्रेक्षणीय स्थळ असतानाही येथे पिकनिक पॉईंट करण्यात आलेले नाही. या भागात मीनी पिकनिक पॉईंट होणे आवश्यक आहे. शहरात येताना प्रत्येक जण सोलापुरात पाहण्यासारखे काहीच जायचे कशाला असा विचार करत आहे. सोलापूर हे ज्येष्ठांचे शहर होत चाललेले आहेत शहरातील युवक शिक्षणासाठी नोकरीसाठी अन्य शहरात जात आहेत. असे झाल्यास सोलापूरचा विकास होणे शक्य नाही. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे मात्र सोलापूरची अवस्था पाहिल्यावर आपण त्याला पात्र आहोत का असा प्रश्न पडत आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडे हद्दवाढ भागात कोणती कामे झाली, कोणती कामे पेंडिंग आहेत कोणत्या कामाचा विकास निधी परत गेला आहे, हद्दवाढ विभागाचा विकास करण्याचा आराखडा तयार आहे का, अशी विचारणा यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी केली. महापालिकेने सुरू केलेली गुंठेवारी योजनाही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही त्याबाबत ही महापालिका जनजागृतीमध्ये कमी पडत आहे. या सर्व व्यथा पाहता महापालिकेचे हद्दवाढ भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट जाणवते. त्यामुळे पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी हद्दवाढ विभागाकडे जास्त लक्ष केंद्रित करावे आणि येथील लोकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी अपेक्षाही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,माजी सभागृह नेते श्रीनिवास कारली, सरचिटणीस शशिकांत थोरात, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसेविका अश्विनी चव्हाण, नगरसेविका मेनका राठोड, राजश्री बिराजदार, मीनाक्षी कंपली, मनीषा हुच्चे, उपायुक्त धनराज पांडे, उपायुक्त एन.के पाटील,नगर अभियंता संदीप कारंजे व सर्व विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
चौकट
आ. देशमुख यांच्या प्रशासला सूचना
या बैठकीमध्ये आ देशमुख यांनी नगरोत्थानचे कामे लवकर करावीत. कंबर तलाव सुशोभीकरण, दलित वस्ती संदर्भातील कामे, हद्दवाढ भागातील ड्रेनीज संदर्भातील कामे, हद्दवाढ भागामध्ये एलईडी लाईट पोल बसविणे तसेच विजापूर रोड, जुळे सोलापूर भागात चिल्ड्रन पार्क करणे, डी मार्ट समोरील जागेत बगीचा सुशोभीकरण करणे, आसरा फुल रुंदीकरण, जिल्हा परिषद शाळा मनपाकडे हस्तांतरण करणे, हद्दवाढ भागात अंगणवाडी सुरू करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या.
पुढील तीन महिन्यात हद्दवाढ भागातील विविध ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत याकरिता शासन दरबारी अवश्यक ते प्रयत्न करून निधी उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न केले जातील असेही आ. देशमुख म्हणाले.

COMMENTS