भ्रष्टाचार..

भ्रष्टाचार.. लोकपाल विधेयकावरून बरीच खळबळ होत होती.मला मनापासून असं वाटतं की समाजातील प्रत्येक बरी वाईट गोष्ट कायद्याने बंद होत नाही किंवा सुरु होत

भ्रष्टाचार..

लोकपाल विधेयकावरून बरीच खळबळ होत होती.मला मनापासून असं वाटतं की समाजातील प्रत्येक बरी वाईट गोष्ट कायद्याने बंद होत नाही किंवा सुरु होत नाही. सरकार कायदे करतं पण ते खऱ्या अर्थाने अंमलात येतील, जेव्हा तुम्ही-आम्ही मनापासून त्याचा स्वीकार करू. म्हणूनच सगळे प्रश्न कायद्याने सुटत नसतात, तर त्याला जनमानसाचा आधार लागतो, निश्चय लागतो.

भ्रष्टाचार या चार अक्षरांनी अवघं मानवविश्व व्यापून टाकलंय. छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा माणूस हा भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडला आहे. लाच घेणारा जेवढा भ्रष्ट तेवढाच लाच देणारापण. आता हेही खरं आहे कि सरकार दरबारी चिरी-मिरी दिल्याशिवाय कामं होत नाहीत. असाच एकदा मित्रांच्या घोळक्यात गप्पा मारत बसलो होतो. विषय होता लोकपाल विधेयक, भ्रष्टाचार. तेव्हा एका मित्रानं सांगितलं कि,तुमचं म्हणणं बरोबर आहे. भ्रष्टाचार वाईट आहे. पण आता मी एक प्रसंग सांगतो तुम्हाला, तो ऐकून तुम्ही मला सांगा की माझं काय चुकलं ? आणि तो पुढे सांगू लागला. मला एक उद्योग सुरु करायचा होता. त्यासाठी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करूनही फाईल पुढे सरकत नव्हती. शेवटी काही लाखांची लाच दिल्यावर फाईल पुढे सरकली. उद्योग सुरु झाला. आज पाच पन्नास मानसं तिथं काम करताहेत. गावाची आर्थिक स्थिती चांगली होण्यास थोडा का असेना, माझा हातभार लागला. परंतु समजा, त्यावेळेस मी ते काही लाख रुपये दिले नसते, तर हा उद्योग मी सुरु करू शकलो असतो का ? यात माझं काय चुकलं ? ते ऐकल्यावर मी त्याला म्हटलं. बाबारे, चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाम मार्ग वापरणं चुकीचंच, पण आता तू तसं वागत नाहीस ना ?  बघ ना ते  काही लाख काढण्यासाठी तू लोकांची पिळवणूक करतोस का ? पैसे घेऊन कामाला लावतोस का ? अवैध्य मार्गाने कमिशन मिळवतोस का ? तर असं काहीही तू करत नाहीस, याचाच अर्थ लाच देताना ज्या यातना तुला झाल्या त्या यातना दुसऱ्याला भोगायला लागू नयेत हि तुझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून मला वाटतं तू त्यावेळी चुकलास तरी तुझं वागणं त्या क्षणी योग्य होतं.

असे प्रसंग बऱ्याच जणांवर येताहेत. समाजामध्ये दोन व्यक्ती एकाच ठिकाणी कामावर असतात. बुद्धीमत्तेनुसार, कौशल्यानुसार कामाची विभागणी झालेली असते, त्यामुळे मिळणारे पगार, प्रतिष्ठा त्यामध्येही तफावत असते. २० रुपये किलोचा गहू एकजण खातो. कपडे दोघांनाही हवे असतात, पण  तर दुसरा एका खोलीत दोन जणांना घेऊन राहतो, पण एकजण ब्रँडेड कपडे घालतो, दुसरा साधे. एकजण सहा खोल्यांच्या घरात चार जन घेऊन राहतो, तर दुसरा एका खोलीत दहाजणांना घेऊन राहतो. तुलनेला सुरुवात होते पैसा, प्रतिष्ठा कोणाला नको असते ? मग अवैध मार्गाने पैसा मिळणार असेल, तर तो सहजतेने घरात यायला लागतो. स्वप्नांची पूर्तता भ्रष्टाचाराने आलेल्या पैशातून व्हायला लागते. राजकारण घ्या, शिक्षण व्यवस्था घ्या वा अन्य कोणतेही क्षेत्र निवडा, प्रत्येक ठिकाणी हा भ्रष्टाचार राजरोसपणे मिरवताना दिसतोय. तुम्ही जर पैसे घेऊन मतदान करत असाल, तर त्या राजकारण्याकडून भ्रष्टाचार विरहित वागण्याची अपेक्षा कशी करू शकता ? लाखो रुपये मोजून डॉक्टर होणारा वैद्यकीय व्यवसाय सेवाभावाने करेल याची खात्री देता येईल ?लाखो रुपये देऊन प्राध्यापक, शिक्षक म्हणून नोकरी मिळणार असेल, तर नितीमत्ता, समाजसेवा, विद्यादान असं म्हणून मुलांना शिकवणं, पिढी घडवणं कसं शक्य होणार आहे ? अर्थात हे असंच चालणार आहे असं म्हणत हातावर हात धरून गप्प बसलं तर चालणार आहे का ? डोळे मिटून घेऊन आजूबाजूला चालणाऱ्या सगळ्या घटनांकडे दुर्लक्ष करणं बरोबर आहे का ? तर मला वाटतं, हे काही बरोबर नाही. वाईट गोष्टी वाईटच आहेत, हे सतत आणि सातत्याने सांगावं लागणार आहे तेही मनापासून.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम जागवलं पाहिजे. राष्ट्राप्रती प्रेमच या विघातक प्रवृत्तीला, भ्रष्टाचाराला आळा घालू शकेल. माझं राष्ट्र उन्नतीकडे गेलं पाहिजे, माझ्या राष्ट्राचे नाव जगभरात आदराने घेतलं गेलं पाहिजे, माझं राष्ट्र भ्रष्टाचारमुक्त झालं पाहिजे, या जाणीवा प्रत्येकाच्या मनात असल्या पाहिजेत. दुसरा कोणी भ्रष्टाचार करू नये असं सांगण्यापेक्षा स्वतःपासून तशी सुरुवात करायला हवी. मी भ्रष्टाचार करणार नाही, असं जेव्हा प्रत्येक भारतीय ठरवेल तेव्हा वेगळी राष्ट्रभक्ती अभिप्रेत असणार नाही. आपल्या देशाला यापेक्षा  वेगळ काय हवं ? म्हणूनच देशभक्ती जागवा, देशाप्रती स्वाभिमान बाळगा, तसं वागा म्हणजे मग देशाच्या उन्नतीत कोणी आड येऊ शकणार नाही. मी माझ्या परीने या दृष्टीने कार्य करतो आहे. पारदर्शी कारभार असलेला लोकमंगल समूह अशी ओळख व्हावी आणि पारदर्शक कारभार करणारं मॉडेल म्हणून लोकमंगल समूहाचं नाव व्हावं, असे आमचे प्रयत्न सुरु आहेत. मी आशावादी आहे. भ्रष्टाचार हळूहळू का होईना कमी होईल अशी आशा बाळगून आहे.

COMMENTS