पत्रकारितेला सलाम !

पत्रकारितेला सलाम ! खरंच पत्रकारांकडे समाजाविषयीचं एक वेगळ भाग असतं, त्यांच्या विचारांची एक वेगळी बैठक असते.घडलेल्या घटना सर्वसामान्यांपर्यंत योग्य

पत्रकारितेला सलाम !

खरंच पत्रकारांकडे समाजाविषयीचं एक वेगळ भाग असतं, त्यांच्या विचारांची एक वेगळी बैठक असते.घडलेल्या घटना सर्वसामान्यांपर्यंत योग्यरीतीने पोहोचवण्याचं कसब, आंतरिक उर्मी, सर्वसामान्यांविषयी कळवला, प्रसंगाचं गांभीर्य जाणणं, सोय, गैरसोय आदीचा विचार न करता त्या बातमीचा पाठपुरावा करून वेळेत बातमी पोहचवण्याची जबाबदारी, वृत्ती अशा कितीतरी चांगल्या बाबी त्यांच्याकडे असतात म्हणून एखादी घटना तत्परतेनं लोकांपर्यंत वृत्तपत्राच्या माध्यमातून पोहचली जाते.

लोकमंगलतर्फे पत्रकारांच्या कार्याला सलाम करण्यासाठी गेल्या अनेक वर्षीपासून लोकमंगल आणि श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं लोकमंगल गौरव पुरस्कार देण्यात येतोय. यंदाच्या दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार दिल्ली येथील लोकसत्ताचे श्री. सुनील चावके, कृषीवल पुणेचे मुख्य संपादक श्री. संजय आवटे सोलापूरच्या विविध वृत्तपत्रातून कार्यरत राहिलेले श्री. गिरीश मंगरुळे आणि जीवनगौरव पुरस्कार करमाळ्याचे श्री. शंकरराव येवले यांना देण्यात आला.

खरं सांगायचं तर माझ्या शालेय जीवनात वा नंतरही पत्रकारांच्या संदर्भात मला विशेष आस्था नव्हती. मी ग्रामीण भागातला आणि घरची परिस्थिती यथातथा असल्याने, तसंच पुढं जगण्याचा संघर्ष तीव्र झाल्याने वर्तमानपत्रं वा पत्रकारिता या विषयी विशेष माहिती जाणून घेण्याचा विचार कधी मनात आला नाही, पण पुढे एक घटना घडली आणि मग वर्तमानपत्रं, पत्रकारिता आणि सर्वसामान्य जनता व नागरिक यांचा किती जवळचा संबंध आहे, याची तीव्रतेनं जाणीव झाली.

तो प्रसंग असा :- ३० सप्टेंबर १९९३ साली गणेश विसर्जनाच्या पहाटे किल्लारीला भूकंप झाला. त्यावेळी मोबिल नव्हते किंवा टीव्ही चं जाळ एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं. सोलापूरसह अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले, पण सोलापुरातला भूकंपाचा धक्का तीव्र होता. सकाळ होता होता चर्चेला उत आला होता. पण कुठे काय झालं, किती नुकसान झालं, किती लोकांच्या जीविताला धोका झाला, मालमत्तेची किती हानी झाली ? यासंदर्भात काहीच कळेनासं झालं होतं. परंतु जेव्हा वर्तमानपत्र हातात पडली तेव्हा भूकंपाची तीव्रता जाणवली आणि पहिल्यांदा स्पष्टपणे लक्षात आलं कि, ही बातमी आपल्यापर्यंत पोहचवली आहे. ती या वर्तमानपत्रानं व या वर्तमानपत्रातून काम करणाऱ्या पत्रकारांनी. आणि मग वाटलं खरंच पत्रकारांकडे समाजाविषयीचं एक वेगळ भान असतं, त्यांच्या विचाराची एक वेगळी बैठक असते.

आज इलेक्ट्रोनिक माध्यमांचाही जनसामन्यांवर चांगलाच पगडा आहे, कारण आखो देखा हाल आपण स्वतः अनुभवत असतो. असं असलं तरी वर्तमानपत्रात विस्ताराने आलेली  वाचायला आपल्याला आवडते. बहुतेक वर्तमानपत्रातून जबाबदारीनं घटनांची मांडणी केलेली असते. या माध्यमातूनच राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय, राज्य, जिल्हास्तरीय घडामोडींचं विश्लेषण करायला आपल्याला सोप्प जातं. पत्रकारांमुळे समाजातले राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, शिक्षण आदी अनेक क्षेत्राबद्दल आपण अपडेट राहायला लागलोय. लेखक पुस्तक लिहितो. ते वाचल्याने ज्ञानात भर पडते. तसंच पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या दैनंदिन घटना आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीच ज्ञान देतात. वर्तमानपत्रातून बऱ्या आणि वाईट दोन्ही घटना /बाबी आपल्याला कळतात. अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर अण्णा हजारेंनी जे आंदोलन उभं केलं त्याला मिळालेला प्रतिसाद हा वर्तमानपत्रांनी पत्रकारांनी अण्णांच्या आंदोलनाची जी दखल घेतली त्याचा परिणाम होता. सोलापुराविषयी बोलायचं झालं तर सोलापूरला सजग समाजाभिमुख पत्रकारांची एक उत्तम परंपरा पाहायला मिळते. कै. रंगाअण्णा वैद्य या संचारच्या जेष्ठ – श्रेष्ठ संपादकाला सोलापूर विसरणंच शक्य नाही. समाजाभिमुख पत्रकारिता करणारा एक निर्मळ मनाचा संपादक म्हणून सोलापुरात त्यांना ओळखतात. माझी त्यांची कधी भेट नाही झाली, पण मी त्यांना ओळखत होतो, त्यांच्या कार्यानं. अगदी पूर्वी सोलापुरात कै. बाबुराव जक्कल हे समाचार नावाचं वर्तमानपत्र चालवायचे. कै. वसंतराव एकबोटे, कै. पिंपरकर, कै. वी. आ. बुआ, यांच्या पत्रकारिता, केसरीचे तात्या कुलकर्णी, प्रभाकर नूलकर यांना सोलापूरकर अजूनही विसरले नाहीत.

पूर्वी वर्तमानपत्रं संपादकांच्या नावाने ओळखली जात, कारण तो संपादक तेवढा बहुश्रुत असे. समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदी विषयांचं सखोल ज्ञान, पत्रकारितेशी एकनिष्ठा, कोणत्याही अमिषाला बळी न पडता लोकशाहीतल्या या चौथ्या स्तंभाची प्रतिष्ठा सर्वस्वानिशी जपणं, समाजातल्या प्रश्नांविषयी आंतरिक तळमळ यामुळे ते संपादक वर्तमानपत्राच्या मालकापेक्षा मोठे होते. आचार-विचारानं, चारित्र्यानं संपन्न होते. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लोक त्यांच्याकडे पाहायचे, पण दुर्दैवाने आज परिस्थिती बदलली आहे. ध्येय, निष्ठा, प्रामाणिकता, पत्रकार म्हणून असलेली जबाबदारी याची म्हणावी तेवढी गांभीर्याने काही पत्रकारांकडून दखल घेतली जात नाही. तेव्हा आपल्या पत्रकारितेला कशाचंही गालबोट न लागता, समाजाची सेवा घडावी या वृत्तीनं पत्रकारांनी कार्यरत राहावं, हि सदिच्छा !

पुरस्कार देणाऱ्यापेक्षा पुरस्कार ज्यांना दिला जातो त्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींमुळे पुरस्कार मोठा होतो, म्हणूनच पुरस्कार देताना योग्य व्यक्तींची निवड करणं हे फार जोखमीचं काम असतं आणि ते काम लोकमंगल पत्रकरिता पुरस्काराची निवड समिती अतिशय सजगतेने करते याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त पत्रकाराचं आभार मानतो आणि थांबतो.

COMMENTS