निर्मितीचे डोहाळे

निर्मितीचे डोहाळे २०१२ च्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं क्रांतीनं प्रवेश केला असं वाटलं तर वावगं होणार

निर्मितीचे डोहाळे

२०१२ च्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं क्रांतीनं प्रवेश केला असं वाटलं तर वावगं होणार नाही. कारण नाविन्याचा सतत शोध घेण्याची व उत्तम कार्य करण्याची मनीषा, नवनवीन विचार, समाजासाठी काही सुंदर, शुभ, सर्वसामान्याचं भलं व्हावं यासाठीची मनात असलेली उर्मी हे सारं घेऊन तुम्ही सर्व तरुण या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलात. म्हणूनच वाटतं की,स्वातंत्र्यानंतरची ही एका प्रकारची क्रांतीच झाली. तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करताना मला खूप आनंद होतोय. माझ्यासारख्या अनेकांनी असं स्वप्न पाहिलं की, तरुण रक्तानं आता राजकारणात सक्रीय झालं पाहिजे. धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या तरुणांकडे गाव तालुका, शहर, पर्यायाने राज्य आणि देशाचा विकास करण्याची शक्ती आहे आणि ही शक्ती ध्येयाने प्रेरित होऊन समाजासाठी सर्वार्थाने सक्रीय झाली पाहिजे आणि आता हे झालंय.

स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षानंतरचे हे चित्र खूप आशादायी आहे. आज जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. नवनवीन समस्या, अडचणी, जागतिकीकरणाचा रेटा, बेकारी,महागाई यामुळे सर्वसामान्यांचे जिणे मुश्कीलीचं होऊन बसलंय. या पार्श्वभूमीवर निवडून आलेल्या तुम्हा तरुण नगरसेवकांसमोर खूप आव्हानं आहेत आणि ही आव्हानं पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. विश्वासानं जनतेनं तुम्हाला निवडून दिलं आहे. केवळ आश्वासन देणारे, काम न करणारे, भ्रष्टाचारानं बरबटलेले असे जे निष्क्रिय लोक आहेत त्यांना नाकारून, त्यांच्या एकंदर कारभाराला कंटाळून मतदारांनी तरुण, नवीन होतकरू युवक – युवतींवर विश्वास टाकलाय. तेव्हा या विश्वासाला तडा जाऊ न देता तुम्हा मंडळींना महानगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद इथे कार्य करायचं आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, समाजात राजकारण्याविषयी जी प्रतिमा मलीन झाली आहे, ती पुसून काढण्याची खूप मोठी जबाबदारी तुम्हा तरुणांवर आहे. राजकारणी म्हटलं की, तो लबाड, गोडबोल्या, नाटकी भ्रष्टाचारी, फक्त स्वतःचा आणि नातेवाईकांचा विकास साधणारा, जनतेच्या कामाशी देणं – घेणं नसणारा, अधिकाराचा सत्तेचा दुरुपयोग करणारा आदी अनेक दुर्गुणांनी युक्त असणारा, अशी प्रतिमा समाजात आहे आणि म्हणून चांगली नीतिमान, ध्येयवादी मंडळी राजकारणात यायला नाखूष असतात, पण या सगळ्या गोष्टी बाजूला सारून तरुण पिढी राजकारणात सक्रीय झालेली आहे, याचा मला खूप आनंद वाटतोय. या सगळ्याच तरुणांनी राजकारण्यांची वाईट प्रतिमा बदलून टाकण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.

महानगरपालिकेत, जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक म्हणून जा किंवा विरोधी पक्षाचे नगरसेवक म्हणून जा, मात्र सर्वप्रथम तुम्ही या शहराचे नगरसेवक आहात, हे लक्षात ठेवायला हवं. केवळ ज्या प्रभागातून, वार्डातून मी निवडून आलो, तेवढाच माझा संबंध हा विचार न ठेवता शहराचा सुयोग्य कारभार करण्याची महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे, याचा विसर पडू देऊ नका, अशी माझी विनंती आपल्या सगळ्यांना असणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ज्या संस्थेवर निवडून गेलात, मग ती पंचायत समिती असो, जिल्हापरिषद असो वा महानगरपालिका असो, त्या गावासाठी, वार्डासाठी, परिसरातील सामान्य नागरिकांसाठी मुलभूत सुविधा देऊ शकतो, याचा अभ्यास तातडीने करायला हवा. नगरसेवक वा जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्याला काय काय अधिकार आहेत? विकास कामासाठी पैसा कसा उपलब्ध होतो ? राज्य, केंद्रशासन यांच्याकडून कोणत सहकार्य मिळत ? सामान्य जनतेच्या भल्यासाठी या सगळ्या गोष्टींचा कसा उपयोग करता येईल? याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सरकारी अधिकाऱ्यांशी वागणं – बोलणं कसं असलं पाहिजे, त्यांच्याकडून काम करून घेतानाची आपली भाषा सभागृहाच्या संकेतानुसार असली पाहिजे. अधिकाऱ्यांवर वचक राहावा असं वाटत असेल तर सत्तेने नव्हे तर तुमच्या प्रामाणिक कार्यावर ती बाब अवलंबून असणार आहे. विनाकारण अधिकाऱ्यावर दबाव आणणं चुकीचं ठरेल. तुम्हाला तुमच्या अधिकाराचं, कामाचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. अर्धवट ज्ञानान जर तुम्ही त्यांच्याशी बोललात किंवा वागलात तर ते तुमची पोथी ओळखतात. तुमच्या कामापाठीमागचा उद्देश जनहीताचाच आहे हे कळलं, तर ते तुम्हाला निश्चित सहकार्य करतील, नव्हे त्यांना ते करावंच लागेल. कारण उद्देश चुकीचा नाही हे कळलं तर त्याचा एक सात्विक प्रभाव त्यांच्यावर पडतो.

प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणूक लागणार. त्या प्रत्येकवेळी तुमचा प्रभाग तोच असेल, याची खात्री देता येत नाही. आरक्षण देखील वेगवेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वातंत्र्यानंतरच्या या साठ – पासष्ट वर्षात अनेकजण नगरसेवक म्हणून महानगरपालिकेच्या सभागृहात बसले असतील, परंतु कितीजण आपला प्रभाव पाडू शकले ? कितीजण शहर विकासासाठी तळमळीनं काम करताना दिसले ?कितीजणांच्या कार्याचा ठसा जनमानसी ठसलाय ? स्वतःला ज्यांनी आपल्या कर्तव्याचा विसर पडू दिलेला नाही असे. हाताच्या बोटावर मोजले जावेत इतकेच असतील, आता यापुढे वार्ड राखीव होणं, बदलणं या बाबी अपरिहार्य आहेत, म्हणून तुमचं सर्वसामान्यांसाठी कामच असं पाहिजे की तुमचा वार्ड बदलला, तुम्ही दुसऱ्या वार्डातून उभे राहिलात, तर आधीच्या वार्डातल्या नागरिकांना तुमच्या कामाची खात्री वाटली पाहिजे.

खरं तर खूप काही करता येण्यासारखं आहे. यासाठी प्रत्येक वेळी पैसाच लागतो असं नाही, तर लोकसहभाग, तुमची कामाप्रती निष्ठा इच्छाशक्ती, लोककल्याणाच्या कल्पना सूचना या सगळ्यांमुळे शहराचा, गावाचा विकास होऊ शकतो. सरकारच्या ज्या विविध योजना शेतकरी, विद्यार्थी, महिला आदींसाठी आहेत, त्यांची माहिती घेऊन त्या त्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अमी त्याबाबत पाठपुरावा करून संबंधिताना लाभ मिळवून देण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सर्वसामान्य जनतेने तुम्हाला निवडून देऊन तुम्हाला संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी मात्र आता सर्वस्वी तुमची आहे.

कवी बा. भ. बोरकर म्हणतात,

“देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले सुमंगलाचे सोहळे”

देखणी ती पावले जी ध्यासपंथी चालती

वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती.”

तुम्हा सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे माझ्याकडून आणि लोकमंगल परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्यासाठी तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

COMMENTS