नम्रता

नम्रता मी एका गोष्टीचा विचार करतो कि, देवळाचे दरवाजे लहान का असतात ? तर माझ्या मते माणूस खूप बुद्धिमान, सहजासहजी कोणासमोर न झुकणारा आहे. स्वत्स, “म

नम्रता

मी एका गोष्टीचा विचार करतो कि, देवळाचे दरवाजे लहान का असतात ? तर माझ्या मते माणूस खूप बुद्धिमान, सहजासहजी कोणासमोर न झुकणारा आहे. स्वत्स, “मी” पणा त्याच्यात भरलेला आहे. बुद्धिमान असल्याने निसर्गावर हा सतत मात करत राहणार. त्यामुळे “माझ्यामुळे हे सर्व घडतंय” आणि ‘माझ्यासाठी हे सगळं आहे’ असा एक अहंभाव माणसात राहणार आहे. पण नम्रता जर माणसात नसेल तर त्याच्या या कर्तृत्वाला काहीच किंमत नाही. स्वभावात नम्रता येण्यासाठी शरीर कोणासमोर तरी झुकलं पाहिजे. यासाठी देवळाचे दरवाजे लहान असावेत. जेणेकरून देवासमोर येताना तरी ताठ माथा थोडासा झुकवून, कमरेत वाकून तो आत येईल सर्वशक्तिमान अशा त्या शक्तीस नम्र होईल. एखादा माणूस सर्वगुणसंपन्न असेल पण त्याच्यात नम्रता नसेल तर त्या गुणसंपन्न व्यक्तिमत्वाला अपुरेपण येईल असं मला वाटतं. आज जर आपण सभोवार पाहिलं तर शिक्षण, सत्ता, पैसा, बुद्धीमान या कशाचा ना कशाचा “अंहं”बहुतेकांमध्ये आढळून येतो. अभिमान असावा पण दुराभिमान असू नये. तुमच्या अभिमानाचा त्रास इतरांना होऊ नये. तुम्हाला ईश्वरानं ज्या या शक्ती दिलेल्या आहेत त्याचा उपयोग दुसऱ्यांच्या कल्याणासाठी कसा करता येईल ? समाजातील दुखीतांसाठी,अडल्या-नडल्यासाठी कसा करता येईल ? याचा मनापासून विचार होणं महत्वाचं वाटतं. आणि जो असा विचार करतो त्यांच्याकडे नम्रता आपोआपच येईल. “अंहं” नष्ट होईल. यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे ते तुम्हाला मनापासून, अंतःकरणापासून दुसऱ्यांसाठी कणव, प्रेम, माया वाटली पाहिजे. माणूस एक की सत्ता असो वा पैसा, गोष्टी कायमस्वरूपी राहणाऱ्या नाहीत. सत्ता आणि पैसा या खूप चंचल आहेत. तुम्हाला मान मिळतो तो पैसा आणि सत्तेमुळेच. पण तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल आदर असेल, ममत्व असेल तर तुम्ही कोणत्याही अवस्थेत असलात तरी लोकांना तुमच्याप्रती आपलेपणा वाटतो. ते तुम्हाला मान – सन्मान देतात.

हो ! पण कधी कधी नम्रतेच्या नावाखाली खूप लोक लाचारीने वागतात. लाचारी म्हणजे नम्रता नव्हे. अर्थात गरिबी माणसाला लाचार बनवते. नाइलाजानं त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबासाठी, रोजच्या जगण्याचा लढा लढण्यासाठी लाचारी पत्करावी लागते. शक्तिमान माणसं दुर्बळांना लाचार बनवतात. हा दोष त्या शक्तीमानांचा असतो. पण खूप ठिकाणी आपण पाहतो कि, आत्यंतिक स्वार्थापोटी, जास्त मिळण्याच्या हव्यासापोटी,सत्ता संपत्तीच्या लोभापायी मानसं नम्रतेचा बुरखा घालून लाचार बनतात. अशा वेळी स्वाभिमान त्यांनी गुंडाळून ठेवलेला असतो. लोभापायी लाचार झालेली माणसं समाजाचं कल्याण करू शकतील का ? याचा विचार सर्वसामान्यांनी करायला हवा. स्वार्थापोटी कुणाकुणाच्या, ज्यांची लायकी नसताही, पाया पडताना आपण अनेकांना बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल. अर्थात पाया पडणं हि आपली संस्कृती अहर. जेष्ठ, बुद्धिमान, गुरुजन,आई-वडील यांना नमस्कार केलाच पाहिजे. वारकरी संप्रदायात तर समोरच्या माणसातल्या देवत्वाला नमस्कार करण्याची पद्धत आहे. एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याच्या पाया पडतो ते समोरच्या माणसातही देव आहे या भावनेनं. तिथं उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा कोणताही भेदभाव नसतो. पण मला अमुक-अमुक मिळू दे या हव्यासापोटी पाया पडणं हि संस्कृती नव्हे तर विकृती आहे.

मला असंही वाटतं की जिथं श्रद्धा आहे तिथं नम्रता येते. मग ही श्रद्धा माणसांच्या गुणावर, स्वभावावर, त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर असल्याने त्या माणसासमोर आपण नम्र होतो. मोठमोठे कलावंत, लेखक, शास्त्रज्ञ यांची जीवनचरित्र पाहिली तर त्यांच्या स्वभावगुणात नम्रतेला खूप मोठं स्थान आढळतं.

एखाद्या गायकाची मैफल रंगली आणि रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली तर तो गायक हात जोडून प्रेक्षकांसमोर नतमस्तक होतो. नाटकातला जेष्ठ/श्रेष्ठ कलावंत रंगमंचावर माथा टेकून नम्र होतो. अभिजात नृत्य सादर करताना नृत्यांगना नटराजासमोर सर्वस्वाने होते. शास्त्रज्ञाचा एखादा शोध जगन्मान्य झाला तर तो स्वतःच्या शास्त्रापुढे नतमस्तक होऊन परमेश्वराचे आभार मानतो. मला वाटतं हि खरी नम्रता.

तुम्हाला भरभरून परमेश्वरानं, निसर्गानं, लोकांनी खूप काही दिलं तरी त्याबद्दल गर्व न वाटू देता नम्रतेनं या गोष्टी स्वीकारण्याचं मनाचं मोठेपण असणं महत्वाचं आहे. नम्रतेसाठी माझ्यातल्या “मी” पानाचा त्याग करणं ज्याला जमेल तो सर्वोत्तम माणूस असेल. पण हे होईल का ? प्रयत्न करायला काय हरकत आहे नाही का ?

COMMENTS