थिंक टँक

थिंक टँक आपण अनेक पुस्तकांमधून वाचला असेल किंवा पुरातनकाळातील कथा ऐकल्या असतील, त्या काळात जे राजे-राजवाडे होते त्यांच्याकडे, अष्टप्रधान मंडळ न्याय

थिंक टँक

आपण अनेक पुस्तकांमधून वाचला असेल किंवा पुरातनकाळातील कथा ऐकल्या असतील, त्या काळात जे राजे-राजवाडे होते त्यांच्याकडे, अष्टप्रधान मंडळ न्यायाधीश, राजगुरू आदी विद्वान मंडळी राजाला राज्यकारभार करताना मार्गदर्शन करीत. अगदी आजच्या काळातही पंतप्रधान किंवा इतर ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्या सल्लागारपदी विद्वान विचारवंताना नेमलं जातं. देशाच्या उत्कर्षाची दिशा निश्चित होण्यासाठी अशा विचारवंताच्या सल्ल्याची आवश्यकता असते.

गेल्या पंधरा – वीस वर्षात अशा ज्ञानी लोकांसाठी थिंक टँक हा नवीन शब्द रूढ झाला आहे आणि हि थिंक टँक आजच्या जवळपास सगळ्या मोठं-मोठ्या सामाजिक संस्था, कार्पोरेट कंपन्या, अनेक उद्योग काढणारे उद्योजक, याशिवाय राजनीतीत असणारे नेते, राज्याचे, केंद्राचे मंत्री अशा सगळ्यांकडे आवर्जून पाहायला मिळतात. एखादा महत्वाचा निर्णय घेताना थिंक टँकचा सल्ला आवर्जून घेतला जातो. हा निर्णय समाज, संस्था, उद्योग, राज्य, देश आदिसाठी किती महत्वाचा आणि उपयोगी ठरतो त्यावरून ती थिंक टँक किती सक्षम, सुक्ष्मविचारी आहे हे कळत. खरं तर ज्यांच्याकडे अशा थिंक टँक असतात ती व्यक्ती प्रत्येक विषयात परिपूर्ण असतेच असं नाही, सर्वज्ञ असते असंही नाही, पण या विचारवंताच्या विचाराचा सर्वांगाने स्वतःही अभ्यास करून यांचा सन्मान केला जातो.

ज्यांच्याकडे सहकार्यासाठी वेळ देणारे असे विचारवंत असतात ती व्यक्तीही तेवढीच सक्षम आणि विचारी असायला हवी. स्वतःचा उद्योग वाढवण्यासाठी या लोकांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं. हे विचारवंतही तेवढ्याच तोडीचे असावे लागतात. आपल्या ज्ञानाच्या बाबतीत रास्त अभिमान निश्चितच असावा पण दुराभिमान असू नये. विचारविनिमय करताना मतांचा दुराग्रह धरूनही चालत नाही. पण योग्य मार्ग, पर्याय शोधत, शोधत इप्सित गाठायचं असतं. याशिवाय आपल्या विषयातलं ज्ञान नेहमी अपडेट करत राहायला हवं, नाहीतर एखादा निर्णय चुकण्याची वा दुष्परिणामकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या संस्थेत, कंपनीत इतकेच नव्हे तर गाव, जिल्हा, राज्य, देशपातळीवर विचारवंतांचा समूह काम करत असतो तेव्हा विचारांमध्ये मतभेद होण्याची शक्यता असतेच. अशा वेळेस व्यापक हित लक्षात घेऊन प्रसंगी एखाद्या विचारवंताला माघार घ्यावी लागते. अशा वेळेस संयम, एकता खूप महत्वाची ठरते. उद्योग वा कंपनीमधील “थिंक टँक” वैयक्तिक संचालकांचा, मालकांचा विचार करणारी असावीच पण त्याचबरोबर या संबंधित उद्योग कंपनीशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती, कामगार, ग्राहक आदी सगळयांचा विचार करणारी असावी.

सामाजिक व राजकीय क्षेत्रासाठी तर या विचारवंताची भूमिका अवघड, खूप मोठ्या जबाबदारीची, महत्वपूर्ण व समाज देशाचं हित पाहणारी असावी लागते. हे खरं तर एक आव्हान आहेच पण निरपेक्ष भावनेनं, सर्वकष कल्याण नजरेसमोर ठेऊन होणाऱ्या कार्यामुळे एक आत्मिक समाधान देणारंही असतं. तुमच्या बुद्धीकौशाल्यावर जो समाज, देश पुढं जाणारा असतो. समाजातील, देशातील सर्वसामान्य जनतेला सुखी करणारी ही थिंक टँक असते. कोणत्याही मोहाला बळी न पडता तुमच्यावर जो विश्वास समाज्यानं देशानं टाकलेला असतो, त्याला पात्र राहण्यासाठी दक्ष राहावं लागतं देशाच्या आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, महसूल, सांस्कृतिक आदी सगळ्याच क्षेत्रात हि विचारवंत मंडळी काम करत असतात. अशा वेळेस सरकार आणि जनता यांच्या समस्या, अडचणी ओळखून काम करण्याची क्षमता आणि शक्ती यांच्यात असावी लागते.

ज्यांच्याकडे या विचारवंताची मांदियाळी असते. त्या व्यक्तीही ज्ञानी असायला हव्यात. सल्लागारांनी दिलेल्या सल्ल्याची स्पष्टपणे चिकित्सा करता यायला हवी, योग्य माणसांची पर्वा करणं, दुर्जनांना लांब ठेवणं, मत्सर दुर्गुणांपासून स्वतः लांब राहणं या गोष्टी जाणीवपूर्वक जपल्या पाहिजेत. आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत त्या क्षेत्राचं निदान पंच्चाहत्तर टक्के तरी ज्ञान असायला हवं. आपल्या जवळच्या विचारवंताच्या सल्ल्याचा सन्मान करून तो जर पटत नसेल तर त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे, त्यावरही जर वादविवाद होत असतील तर सामंजस्याने मार्ग काढता आला पाहिजे. विचारवंताचचं व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव, त्याच्यावरचे संस्कार याचा अभ्यास आपल्याला हवा.

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळींना निर्णय घेताना या विचारवंताचं मोलाचं सहकार्य मिळतं. समाज – देशहिताचा निर्णय घेताना हे विचारवंत निस्वार्थी भावनेनं निर्णय देताहेत ना, हे जाणून घ्यावं लागतं. याशिवाय कधी कधी पक्ष, संघटना यांच्यापेक्षा देशहिताचा विचार करून या थिंक टँकच्या सल्ल्याचा आदर राखण्याचं धाडसही असावं लागतं. सर्वांग परिपूर्ण विचार होऊन निर्णय घ्यावा लागतो. यश – अपयश ही पुढची गोष्ट आहे. तुम्ही किती प्रामाणिकपणे, तत्परतेने निर्णय घेता आणि तसा सल्ला देता हे महत्वाचं असतं.

आमच्या लोकमंगलचा विचार केला तर आमच्या पतसंस्था, मल्टीस्टेट यांच्या प्रत्येक शाखेशी पंधरा ते वीस जणांचं सल्लागार मंडळ जोडलेलं असतं. माझं पहिल्यापासून मानणं आहे कि, प्रत्येक माणसाची कल्पना, क्षमता यांना मर्यादा असते. प्रत्येक माणसाचं कार्यक्षेत्र वेगळ असतं, स्कील वेगळ असतं. अशा माणसांचा शोध घेऊन ती माणसं संस्थेशी जोडली जावीत. लोकमंगल समूहामध्ये अनेक संस्था, शाखा, माणसं कार्यरत आहेत. माझ्या काही कल्पना असतात, विचार असतात तसे इतरांचेही असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच असं नाही, पण म्हणून हट्टीपणानं ती गोष्ट करणं हे चुकीचं ठरतं. अशा वेळेस संस्थेचं, संस्थेशी निगडीत अशा प्रत्येक घटकाचं हित महत्वाचं मानून आपल्या कल्पना विचार बाजूला ठेवण्याची वृत्ती अंगी मुरवणं महत्वाचं असतं.

कधी – कधी अपूर्ण माहितीमुळे हि सल्लागार मंडळी नकळत थोडेसे वेगळे निर्णय घेण्याचे जेव्हा ठरवतात तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून, समोरासमोर चर्चा घडवून आणून, चोहोबाजूंनी विचारमंथन केलं तर ही सल्लागार मंडळी समजून घेतात आणि निर्णयाचा फेरविचारही केला जातो. मला वाटतं, हे खूप महत्वाचं आहे. अन्यथा “माझंच खरं” असे जर सल्लगार मंडळ किंवा संस्था चालक धरून बसेल तर यातून भलं, शुभ काही होणारच नाही, नाही का?

मी जसं काम करतो, जेमंथन होतं ते “संवाद” च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न मी करतो. हा सगळा विचार, हे मंथन किती बरोबर, किती चुकीचं हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सांगता येईल. तुम्ही संवादचं स्वागत करता हे मात्र माझ्यासाठी आनंदाचं आहे. नेहमीप्रमाणेच तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत मी आहे.

COMMENTS