कुत्र्याच्या मौतीनं मरू नका.

कुत्र्याच्या मौतीनं मरू नका. २६ जूनपासून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. या दिवसापासून ज्यांना वाईट व्यसनं आहेत त्यांनी ती व्यसनं सोडवीत, या व्

कुत्र्याच्या मौतीनं मरू नका.

२६ जूनपासून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. या दिवसापासून ज्यांना वाईट व्यसनं आहेत त्यांनी ती व्यसनं सोडवीत, या व्यसनाने आयुष्य उद्वस्थ होतं, जगणं नरक बनतं याची जाणीव व्हावी म्हणून तर जगभरात हा दिवस पाळला जातो.

दै. लोकमतच्या एका अंकात व्यसनावर अभ्यासपूर्ण पुरवणी वाचनात आली आणि मन अस्वस्थ झालं. आपल्याला नेहमीच वाटतं की मुलींची जात संवेदनशील, पाप-पुण्य मानणारी, शुभ सकारात्मक विचार करणारी, सगळं सोसूनही हसतमुख राहून – आपल्या आजूबाजूचं वातावरणही प्रसन्न ठेवणारी अशी असते. पण आजकाल छोट्या – मोठ्या शहरातून पुणे – मुंबईसारख्या ठिकाणी राहणाऱ्या कित्येक मुली सिगारेट पिणं, मद्य पिणं, नशिल्या पदार्थाचं सेवन करणं अशा गोष्टी करतात हे वाचून, एकूण मन विषण्ण झालं.

खरंतर स्त्रीमुळे घर उभं राहते. घरचे संस्कार घराच्या स्त्रीमुळे टिकून राहतात, नव्या पिढीचं संगोपन तिच्या आचार विचारांवर अवलंबून आहे. केवळ घरच्याच नव्हे तर समाजाच्या आरोग्यपूर्ण मानसिक अवस्थेचं भरण – पोषण स्त्रीच्या हातीच आहे. असं असताना एकीकडे स्त्रीभ्रूणहत्या, पोटातच स्त्री गर्भाचा नाश, तर दुसरीकडे उच्चशिक्षण, तांत्रिक शिक्षण घेतलेल्या या तरुण पोरी नशेच्या आहारी जात असतील तर उद्याच्या समाजाचं स्वास्थ्य कसं आणि काय राहणार ? आज मला बोलायचं ते तरुण मित्रांशी…

मित्रांनो व्यसनं करणारी व्यक्ती, व्यसन लागण्याची अनेक कारण सांगत असते. खरंतर “पिनेवालोको पिनेका बहाना चाहिये” असं कोणा गीतकाराने म्हटलं आहे आणि मला वाटतं हे अगदी खरं आहे. आजकाल सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक परिस्थिती खरंच चांगली नाही, संवेदनशील माणूस यामुळे अस्वस्थ होतोय. तरुणांना तर या सगळ्या परिस्थितीमुळे जगण्याचं मोठं आव्हान उभं राहत आहे. ग्रंथांमधून, घरच्या वडीलधाऱ्याकडून, उत्तम शिक्षण देणाऱ्या गुरुजनांकडून सत्य-शिव-सुंदरतेचे संस्कार होत असताना प्रतिकूल परिस्थिती पेलण्याची ताकद त्यांच्याकडे नसेल का ? माझं करिअर, माझं भविष्य सुरक्षित राहील का ? मी आर्थिक सक्षमतेनं जगू शकेन का ? या विचारांनीही तो सैरभैर झालाय. या सगळ्या प्रश्नांपासून पळून जाण्यासाठी तर हि पिढी नशापाणी करत नसेल ? पण मला वाटतं तरुण पिढीनं शोधलेला हा फसवा मार्ग किती घातक आहे हे त्यांना समजावून सांगण्याची गरज आज खूप आहे. त्यासाठी मित्रपरिवार घरातली मंडळी नातेवाईक, समाजपरिवार यांनी तरुण पिढीला विश्वासात घेऊन, आश्वासकतेने त्यांच्या पाठीवर हात ठेऊन, त्याला न झिडकारता, त्याला समजून घेऊन चांगल्या विचारांचं, आचारांच बीजरोपण करायला हवंय.

तरुण मुलामुलींना मला सांगावसं वाटतं कि, पोरांनो, निसर्गाने दिलेल्या या माणूसजन्माला असं नशेच्या आहारी जाऊ देऊ नका. संकटं, समस्या केवळ तुम्हालाच नाहीत, तर जन्माला येणाऱ्या प्रत्येकालाच आहेत. म्हणून काय सर्व माणूसजातीनं नशापाणी करायचं ? संकटं कोणालाच चुकली नाहीत, पण असं हार मानून हताश होऊन कसं चालेल ? त्यापेक्षा या समस्यांची उत्तरं शोधा, प्रश्नांना, संकटांना सामोरे जा. जो क्षण व्यसन करण्याचा असतो तोच क्षण व्यसन सोडण्याचा असतो. व्यसन सोडण्यासाठी उद्या कधीच उजाडत नसतो. हाच क्षण महत्वाचा हे जाणून घेऊन व्यसन सोडण्याचा प्रयत्न करा. त्रास होईल, खूप त्रास होईल पण दारूबाज, नशेबाज अशा हेटाळणीपेक्षा, घरच्यांना अतीव दुखः देण्यापेक्षा, व्यसनानं शरीर पोखरून कुत्र्याच्या मौतीनं मरण्यापेक्षा कोणाच्या तरी उपयोगी पडून, कोणाचा तरी जीव वाचवून माणसांसारखं मरणं यात सार्थकता आहे, नाही का ? म्हणून म्हणतो, अशा व्यसनी मित्र – मैत्रिणींपासून लांब रहा, पैशाचा विनियोग सत्कार्यासाठी करा. समाजामध्ये खूप प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न करा.

ईश्वरानं धडधाकट शरीर दिलंय, त्याचा उपयोग कोणाच्या कल्याणासाठी करता आला तर करा. हे हात ईश्वरानं दिलेत ते चांगलं काही निर्माण करण्यासाठी, पाय दिलेत ते वाळवंटातही चालत राहून शुभ घडवण्यासाठी. डोळे दिलेत ते हे उत्तुंग नभांगण डोळ्यात साठवून गरुडझेप घेण्यासाठी आणि मन, काळीज दिलंय ते दुखीतांच दुःख ऐकून, पाहून ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठीच.

तेव्हा मित्रांनो अशा या देवस्वरूप देहाचा – मनाचा मान राखा. त्या शरीर-मनात घाणेरड्या, जीवघेण्या व्यसनांना राहायला जागा देऊ नका. जास्त काय सांगू ! तुमच्या तरुण पिढीचं उज्वल भविष्य पाहायला मिळू दे हीच या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो.

COMMENTS