आ. सुभाष देशमुखांच्या इशार्‍यानंतर प्रशासन हालले, सीना नदीसह कुरूल, बेगमपूर शाखा कॅनॉलला पाणी सोडण्याचे आदेश

आ. सुभाष देशमुखांच्या इशार्‍यानंतर प्रशासन हालले सीना नदीसह कुरूल, बेगमपूर शाखा कॅनॉलला पाणी सोडण्याचे आदेश सोलापूर (प्रतिनिधी) उजनी धरणाचे पाण

आ. सुभाष देशमुखांच्या इशार्‍यानंतर प्रशासन हालले

सीना नदीसह कुरूल, बेगमपूर शाखा कॅनॉलला पाणी सोडण्याचे आदेश

सोलापूर (प्रतिनिधी)
उजनी धरणाचे पाणी सीना नदीसह कुरूल आणि बेगमपूर शाखा कॅनॉलमध्ये सोडण्याची मागणी आ. सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. प्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता. आ. देशमुखांच्या इशार्‍यानंतर प्रशासन हालले असून जिल्हाधिकारी कार्यालयाने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंत्यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गुंजेगाव ते हत्तरसंग कुडल दरम्यानच्या जवळपास 25 गावांना पाणी मिळणार आहे.
भीमा-सीना जोड कालव्यातून सीना नदीत पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी तिर्‍हेपर्यंत आलेले असतानाही ते दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या पुढच्या गावांना मिळत नव्हते. सोलापूर तालुक्यातील गावापर्यंत म्हणजे टेल एंडपर्यंत पाणी पोहचलेे नसल्यामुळे शेतकर्‍यांची पीके करपून जात होती आणि जनावरांचे हाल होत असल्याने सीना नदीकाठच्या गावकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. याबाबत गावकरी, शेतकरी आ. देशमुख यांना सतत याबाबत विचारणा करत होते. आ. देशमुख गेल्या पंधरा दिवसांपासून अधीक्षक अभियंता धीरज साळे आणि कार्यकारी अभियंता क्षीरसागर यांच्याकडे दररोज याबाबत पाठपुरावा करत होते. मात्र अधिकार्‍यांकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. त्यामुळे आ. देशमुख यांनी आक्रमक होत शुक्रवारी अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेत पाण्याबाबत भेदभाव केल्यास याद राखा असा सज्जड दम दिला होता. त्वरित सीना नदी व कुरूल आणि बेगमपूर शाखा कॅनॉलमध्ये पाणी ज्यादा प्रेशरने सोडावे आणि टेल एंड पर्यंतच्या गावांना या पाण्याचा लाभ मिळावा, अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने आ. देशमुख यांच्या मागणीची दखल घेतली असून जिल्हाधिकारी कार्यालयाने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंत्यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS