अण्णासाहेब देशमुख यांची गरुडझेप,पारदर्शक व्यवहारातून लाखापासून कोटीपर्यंतची वाटचाल

अण्णासाहेब देशमुख यांची गरुडझेप पारदर्शक व्यवहारातून लाखापासून कोटीपर्यंतची वाटचाल परांडा :- परांडा तालुक्यातील कंडारी गावचे अल्पभूधारक शेतकरी अण्

अण्णासाहेब देशमुख यांची गरुडझेप
पारदर्शक व्यवहारातून लाखापासून कोटीपर्यंतची वाटचाल

परांडा :- परांडा तालुक्यातील कंडारी गावचे अल्पभूधारक शेतकरी अण्णासाहेब देशमुख यांनी जमीन कमी असल्यामुळे उपजीविकेसाठी उद्योग केल्याशिवाय पर्याय नाही हे पाहून २०१२ साली लोकमंगल मल्टीस्टेटकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेऊन विद्युत मोटारी विकण्याचा व्यवसाय सुरु केला.
खरे म्हणजे हा उद्योग अन्य उद्योगासारखाच आहे. परंतु अण्णासाहेब देशमुख यांची कोणताही व्यवहार करण्याची पारदर्शक पध्दत आहे आणि ते नफा कमविण्यासाठी कधी हपापलेले नसतात. त्यामुळे त्यांच्या उद्योगामध्ये गेल्या आठ वर्षांमध्ये एवढी प्रगती झाली आहे की २ लाख रुपयांच्या उलाढालीपासून सुरूवात होऊन आज त्यांच्या व्यवसायातली उलाढाल ३ ते ४ कोटी रुपयांच्या घरात आहे. लोकमंगलचे प्रणेते आमदार मा. आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रेरणेने अजूनही वाटचाल सुरू आहे.
व्यापारी किंवा उद्योजक म्हटला की, तो थोडा डावपेचानेच उद्योग करत असतो आणि त्यातूनही त्याची भरभराट होऊ शकते. परंतु अण्णासाहेबांसारखा व्यापारी कसलेही डावपेच न लढवता सरळ व्यवहार करतो तेव्हा त्याचीही उलाढाल वाढतेच परंतु त्या वाढीतून त्याला एक वेगळे समाधान मिळत असते. असे समाधान हाच आपला नफा असे ब्रिद ठेवणारा व्यापारी नफा तर कमावतोच परंतु आपल्या अनुभवाचा आणि संपर्काचा उपयोग दुसर्‍यांना करून देऊन त्यांनासुध्दा धंद्यात उभे राहण्यास मदत करतो.
२०१२ साली अण्णासाहेबांनी व्यवसायात पाय रोवले आणि सुरूवातीच्या काळामध्ये काही खासगी कर्जे उभी करून कसाबसा व्यापार सुरु केला. परंतु थोडीसी मोठी झेप घ्यायची असेल तर दोन तीन लाखांची गरज आहे हे त्यांच्या लक्षात यायला लागले आणि एवढी रक्कम पाहुण्यारावळ्यांकडून उभी राहणे जमणार नाही हेही दिसायला लागले तेव्हाच लोकमंगल मल्टीस्टेटच्या परांडा शाखेतून त्यांनी २ लाखांचे कर्ज घेतले.
गुजरातच्या राजकोट शहरामध्ये गंगा या ब्रँड नावाने इलेक्ट्रिक मोटारी विक्री करणारी कंपनी असल्याचे त्यांना कळले. तिचे मालक राहुल पटेल. देशमुखांनी राहुल पटेल यांच्या कंपनीने कसलेही डिपॉझिट मागितले नसताना लोकमंगलकडून मिळालेले २ लाख रुपये त्यांना अनामत पाठवून दिले.
अशा प्रकारचा व्यवहार करताना व्यापारी नाना प्रकारच्या चौकशा करतात आणि अनामत रक्कम पाठविण्याबाबत घासाघीस करतात. परंतु महाराष्ट्रातला एक नव्याने व्यापारात येऊ पाहणारा सद्गृहस्थ काही चौकशी न करता २ लाख रुपये पाठवून देतो तेव्हा अशा सरळ स्वभावाच्या व्यक्तीला आपणही तसाच प्रतिसाद दिला पाहिजे असा विचार करून राहुल पटेल यांनी अण्णासाहेब देशमुख यांना भरभरून सहकार्य केले.
अण्णासाहेब देशमुखांचे इलेक्ट्रिक मोटारी विकण्याचे स्वतःचे दुकान परांड्यात आहे. त्या दुकानात बसून त्यांनी राजकोटच्या या कंपनीशिवाय दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, सोलापूर अशा इतरही ठिकाणच्या अनेक कंपन्यांशी व्यवहार सुरू केला आणि बघता बघता त्यांचा व्यापार वाढला. अशा रितीने केवळ प्रामाणिकपणाच्या जोरावर आपण समृध्दी प्राप्त करू शकतो, असे लक्षात येताच अण्णासाहेबांनी आपल्या प्रमाणेच इतरांनाही या व्यवसायात येण्याचा सल्ला द्यायला सुरूवात केली.
लातूर, मुरुड, ढोकी, औसा इत्यादी ठिकाणच्या अनेक दुकानदारांना त्यांनी या कंपन्यांची माहिती दिली आणि त्यांची विक्री वाढवून दिली. या मध्यस्थीबद्दल त्यांनी एक पैशाचेही कमिशन घेतलेले नाही. त्यामुळे तर उत्पादक आणि दुकानदार या दोघांनाही अण्णासाहेबांविषयी अतीव आदर वाटतो.
मराठी माणसाने या धंद्यात आले पाहिजे या तळमळीतून ते अनेक मुलांना प्रेरणा देतात आणि त्यांना उद्योग उभा करुन देण्यास मदतही करतात. त्याबदल्यात काही घेत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या दुकानातला नफाही वाढतच आहे आणि त्यातून त्यांनी भावाला भूम येथे तर बहिणीला जामखेड येथे अशीच दुकाने काढून दिली आहेत. त्यांचीच उलाढाल मोठी आहे आणि त्यात ते समाधानी आहेत. शिवाय आपण अनेकांना कारखान्यांची माहिती दिली आणि कारखान्यांना दुकानदारांची माहिती दिली याचा आनंद ते उपभोगत आहेत.
या कामात त्यांना लोकमंगल मल्टीस्टेटचेे चेअरमन मा. रोहन भय्या देशमुख यांचे पूर्ण समाधान मिळते असे अण्णासाहेबांनी आवर्जुन सांगितले.

COMMENTS